Advertisement

महापौर सायकल चालवत पंढरपूरला रवाना! जळगावकरांचा जल्लोष; ४८५ किमीची ‘सायकल वारी’ सुरू

जळगाव: लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची आस आणि मनात सुदृढ समाजाचा संकल्प घेऊन जळगाव सायकलिस्ट ग्रुपची ‘सायकल वारी’ आज पंढरपूरकडे रवाना झाली. प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या वारीचे यंदाचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे! जळगावच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौर काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीत सहभाग घेतला आहे. आज, गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी पहाटे साडेपाच वाजता आकाशवाणी चौकातून या आगळ्यावेगळ्या वारीचे अत्यंत उत्साहात प्रस्थान झाले.

जळगावकरांचा जल्लोष आणि ‘विठ्ठल नामाचा’ गजर

जळगाव ते पंढरपूर हे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर हे सायकलिस्ट अवघ्या तीन दिवसांत पार करणार आहेत. शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी ही वारी पंढरपूर नगरीत दाखल होईल. आज पहाटे महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व सायकलिस्ट सदस्यांना निरोप देण्यासाठी जळगावकरांनी आकाशवाणी चौकात प्रचंड गर्दी केली होती. उपस्थित महिलांनी सर्व सायकलवीरांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. यानंतर राष्ट्रगीत होऊन ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात ही वारी मार्गस्थ झाली.

ही केवळ धार्मिक वारी नाही, तर आरोग्य चळवळ! – महापौर दीपमाला काळे

सायकल वारीत सहभागी होत महापौरांनी जळगावकरांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “विठू माऊलीच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष आहे. माझ्यासाठी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी एक सामाजिक चळवळ आहे. गेल्या १५३ दिवसांत जळगावची प्रथम नागरिक म्हणून काम करताना मी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या त्रिसूत्रीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. सायकल चालवल्याने इंधनाची बचत होते आणि आरोग्यही उत्तम राहते, हाच संदेश मला या वारीतून संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे.”

जळगावच्या विकासासाठी विठ्ठल चरणी साकडे

महापौर पुढे म्हणाल्या की, “विठ्ठलाच्या चरणी लीन होताना मी वैयक्तिक काहीही मागणार नाही. संपूर्ण जळगाव जिल्ह्याची समृद्धी, आमचा बळीराजा सुखी व्हावा आणि जळगाव शहराचा शाश्वत विकास व्हावा, हेच साकडे मी विठू माऊलीला घालणार आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि ‘हरित जळगाव’ बनवण्यासाठी आम्ही जे विकास व्हिजन हाती घेतले आहे, त्याला माऊलींनी आशीर्वाद द्यावा, हीच माझी प्रार्थना असेल.”

Darpaan Jagat