Advertisement

जळगाव लईच जोरात! ‘देऊळ बंद २’ च्या निमित्ताने प्रवीण तरडे जळगावच्या PVR मध्ये; प्रेक्षकांची तुफान गर्दी.

जळगाव:
मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन आठवड्यांतच करोडोंची घवघवीत कमाई करणाऱ्या या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. याच दौऱ्याचा एक भाग म्हणून काल (११ जून) चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांनी जळगाव शहराला भेट दिली.
जळगाव येथील नवी पेठ, एमजी रोडवरील PVR उत्सव (कीर्ती मॉल) येथे प्रवीण तरडे यांचे आगमन होताच जळगावकर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
दर्पण जगत वृत्तपत्र समूहाकडून सत्कार
या खास प्रसंगी ‘दर्पण जगत वृत्तपत्र समूह’ यांच्या वतीने प्रवीण तरडे यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना स्वामी समर्थांची देखणी प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी दर्पण जगतचे संपादक पवन खंबायत आणि कल्पेश व्हिरोडकर हे आपल्या परिवारासह उपस्थित होते. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्यांनी पुढील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शेतकरी आणि अध्यात्माची अनोखी सांगड
‘देऊळ बंद २’ हा चित्रपट स्वामी समर्थांचे महात्म्य आणि एका शेतकरी महिलेची देवासोबतची अनोखी परीक्षा यावर आधारित आहे. “शेती विकायची नसते, ती राखायची असते” हा संदेश देणाऱ्या प्रवीण तरडेंच्या या चित्रपटाला विदर्भ आणि खानदेशातून प्रचंड प्रेम मिळत आहे.
जळगावकर चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड
काल PVR मध्ये शो संपल्यानंतर प्रवीण तरडे यांनी थेट थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. आपल्या लाडक्या कलाकाराला एवढ्या जवळून पाहून चाहत्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि बोलण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. जळगावकरांचे हे प्रेम पाहून खानदेशची ही भेट नेहमीच स्मरणात राहील, अशी भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.
Darpaan Jagat