Advertisement

जळगावात पेट्रोल तुटवड्याची अफवा; पंपांवर नागरिकांची अचानक मोठी गर्दी.

जळगाव : शहरात पेट्रोल तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवेने आज दुपारच्या सुमारास जळगावात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही पेट्रोलपंपांवर इंधन संपल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी उपलब्ध पंपांवर धाव घेत मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या. परिणामी शहरातील अनेक पंपांवर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

 

आज दुपारी जळगाव शहरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर ‘शहरात पेट्रोलची कमतरता निर्माण झाली’ अशी चर्चा वेगाने पसरली. अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी तत्काळ पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली.

 

मात्र, या संदर्भात पंप चालकांशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की शहरातील केवळ दोन ते तीन पेट्रोलपंपांवर तात्पुरता साठा संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. हा तुटवडा कायमस्वरूपी नसून नियमित पुरवठा सुरळीत सुरू आहे आणि उद्यापासून सर्व पंपांवर इंधन उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

 

पंपचालकांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये.

 

दरम्यान, अचानक उसळलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली होती. दरम्यान नागरिकांनी संयम बाळगून अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Darpaan Jagat