जळगाव : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अर्थात महाराष्ट्राची अधिकृत फुटबॉल संघटना यांच्या मान्यतेने आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा वरिष्ठ महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले आहे. तब्बल 15 वर्षांनंतर जळगावमध्ये राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा होत असल्याने जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही स्पर्धा 21 ते 26 ऑगस्ट 2026 दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथील प्रथमच तयार करण्यात आलेल्या लॉनवर रंगणार आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांचे महिला संघ या स्पर्धेत सहभागी होत असून, सुमारे 500 महिला खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचे जळगावमध्ये आगमन होणार आहे.
21 जिल्ह्यांचे चार गट; जळगावचा गट-बमध्ये समावेश
विफा च्या वतीने स्पर्धेचे लॉट्स व सामन्यांची गटवारी जाहीर करण्यात आली आहे. सहभागी जिल्ह्यांचे चार गट करण्यात आले आहेत.
गट-अ मध्ये मुंबई, रत्नागिरी, पालघर, भंडारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गट-ब मध्ये वर्धा, जळगाव, नंदुरबार, नांदेड आणि अहिल्यानगर हे संघ आहेत. गट-क मध्ये यवतमाळ, धुळे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर गट-ड मध्ये नागपूर, कोल्हापूर, गोंदिया, बुलढाणा, सांगली आणि पुणे हे संघ सहभागी होणार आहेत.
जळगावचा संघ वर्धा, नंदुरबार, नांदेड आणि अहिल्यानगर या संघांसोबत गट-ब मध्ये असल्याने जळगावच्या महिला संघाच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.
*21 ऑगस्टला उद्घाटन; बुलढाणा-सांगली पहिला सामना*
स्पर्धेचे उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. विफा ने जाहीर केलेल्या लॉटनुसार स्पर्धेतील पहिला सामना 21 ऑगस्ट रोजी बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यात होणार आहे.
त्यानंतर 22 व 23 ऑगस्ट रोजी गटातील सामने, 24 ऑगस्ट रोजी उपांत्यपूर्व फेरी, 25 ऑगस्ट रोजी दोन्ही उपांत्य सामने, तर 26 ऑगस्ट रोजी तृतीय क्रमांकाचा सामना आणि अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे सहा दिवस जळगावमध्ये राज्यातील उत्कृष्ट महिला फुटबॉलपटूंच्या कौशल्याचा थरार पाहायला मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे व क्रीडा विभागाचे सहकार्य
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे व त्यांच्या कार्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
जळगावमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या लॉनवर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावरील राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा होत असल्याने जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.
विफा चे अधिकारी व तांत्रिक पथक जळगावमध्ये
स्पर्धेच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी विफा चे अधिकृत मॅच कमिशनर, ऑफिशियल्स, मॅच कमिशन व निवड समितीचे सदस्य जळगावमध्ये उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या तांत्रिक बाबी, सामन्यांचे नियोजन आणि नियमांची अंमलबजावणी विफा चे सेक्रेटरी डॉ किरण चौगुले च्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
या स्पर्धेचे वैशिष्टे
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या सहभागाला आणि नेतृत्वाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. महिला फुटबॉलला राज्यस्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विजेत्या संघासह प्रत्येक खेळाडू व संघाचा विशेष सन्मान
या राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला चषक व पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘सामनावीर’ महिला खेळाडूला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे मुख्य आश्रय दाते अशोक भाऊ जैन व अतुल भाऊ जैन,संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव फारुख शेख, स्वागताध्यक्ष मनोज सुरवाडे व भास्कर पाटील, आयोजन समिती प्रमुख डॉ अनिता कोल्हे, व अमीर शेख, शेखर देशमुख, इम्तियाज शेख, ताहेर शेख, थॉमस डिसूझा, क्रीडा शिक्षिका हिमाली बोरोले, छाया बोरसे, ममता प्रजापत, तौसिफ शेख, वसीम रियाज, साबीर शेख, वसीम चांद, अरबाज खान आदी परिश्रम घेत आहे














