Advertisement

जळगावमध्ये २१ जिल्ह्यांच्या महिला फुटबॉलचा महासंग्राम

जळगाव | प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला फुटबॉल खेळाडूंच्या कौशल्याचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी जळगावकरांना मिळणार आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा), मुंबईच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, २१ ऑगस्टपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे.
या भव्य स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल २१ जिल्ह्यांचे संघ आणि सुमारे ५०० महिला खेळाडू सहभागी होत असून, शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भव्य उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटनानंतर सांगली विरुद्ध बुलढाणा यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना रंगणार आहे.
*तीन वर्षांनंतर पुन्हा हिरवळीवर फुटबॉलचा जल्लोष!*
सुमारे तीन वर्षांनंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या हिरव्यागार फुटबॉल मैदानावर पुन्हा राज्यस्तरीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ फुटबॉल स्पर्धा नसून जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपाली काळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
*जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित*
या स्पर्धेत यजमान जळगाव जिल्ह्याचा संघही दमदार तयारीनिशी सहभागी होत आहे. संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांनी जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित केला आहे. जळगावचा पहिला सामना २२ ऑगस्ट रोजी वर्धा  जिल्हा सोबत होणार असून, आपल्या जिल्ह्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*जिल्हा संघात निवड झालेले खेळाडू*
लतिका अग्रवाल  . कर्णधार (भुसावळ),स्वाती गुप्ता.       उपकर्णधार(जळगाव),हिमाली बोरोले ,
योगिता शिंदे. (४०गाव), अर्शिया तडवी, संस्कृती बोरसे ,मेहक टकारी (भुसावळ),आर्या वाघ (भुसावळ),ईशा पुनिया गौरी परचुरे (भुसावळ),शामल भावसार,संपदा कुलकर्णी, देवयानी सोनावणे ,नम्रता बाविस्कर,दिव्या मोरे,अक्षदा सालोलकर,दीपाली सुरवाडे , ममता प्रजापत
अमृता चौधरी, हिमानी देसाई ,  (गोलकीपर)
 प्रशिक्षक अरबाज खान ( जैन स्पोर्ट्स अकॅडमी), संघ व्यवस्थापक,अँड निलेश्वरी सूर्यवंशी .
*२१ जिल्ह्यांतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवड* 
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन वरिष्ठ महिला
२१ ते २६ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेतून अंतिम विजेता संघ निश्चित होणार असून, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघासाठी तब्बल ३० उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
विफा च्या निवड समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सहभागी प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा आपल्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
*१२ पंच, महिला पंच आणि मॅच कमिशनर सज्ज*
स्पर्धा विफा आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या नियमांनुसार पार पडणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पात्रता प्राप्त १२ पंच, त्यामध्ये महिला पंचांचाही समावेश असून, तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी आणि कोल्हापूरचे मॅच कमिशनर राऊत यांचे जळगावमध्ये आगमन झाले आहे.
*२२ ऑगस्टला तब्बल ८ सामने*
स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार २२ ऑगस्ट रोजी आठ सामने, तर २३ ते २५ ऑगस्टदरम्यान दररोज चार सामने होणार आहेत. २६ ऑगस्ट रोजी दोन सामने झाल्यानंतर भव्य पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होणार आहे.
*खेळाडूंवर बक्षिसांची बरसात!*
या स्पर्धेचे आणखी एक आकर्षण म्हणजे विजेता आणि उपविजेत्यासह प्रथम चार संघांना ट्रॉफी, मेडल्स आणि क्रीडा साहित्य देण्यात येणार आहे.
याशिवाय प्रत्येक सामन्यातील ‘प्लेअर ऑफ द मॅच’ खेळाडूला प्रमाणपत्र व चषक देण्यात येईल. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेंडर आणि उत्कृष्ट स्कोरर यांचाही ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात येणार आहे.
*जळगावच्या मुलींसाठी प्रेरणादायी पर्व*
महिला फुटबॉलला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यातील शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सर्वोत्तम महिला खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी जळगावकरांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
*जळगावकरांनो, मैदान भरून टाका!*
ही केवळ स्पर्धा नाही; ही आपल्या मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याची संधी आहे!
जळगावच्या नागरिकांनी, विशेषतः महिला, मुली, शाळकरी विद्यार्थिनी, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उपस्थित राहून महिला फुटबॉलपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन व अतुल जैन, अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे आणि सचिव तथा आयोजन समिती प्रमुख फारूक शेख यांनी केले आहे.
जळगावच्या मैदानावर महाराष्ट्राच्या २१ जिल्ह्यांतील मुलींचा संघर्ष, कौशल्य आणि जिद्द पाहण्यासाठी चला… मैदान गाजवूया, मुलींना प्रोत्साहन देऊया आणि जळगावच्या महिला फुटबॉलला नवे आकाश देऊया.
Darpaan Jagat