जळगाव: शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात गेल्या महिन्यात महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या मोहिमेनंतर काही दिवस परिसर स्वच्छ दिसून आला; मात्र सध्या पुन्हा एकदा मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे व्यापारी तसेच ग्राहक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिका प्रशासन, सफाई कर्मचारी आणि संबंधित सफाई ठेकेदार यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने बाजारपेठेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
यासोबतच गोलाणी मार्केट परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची समस्या देखील गंभीर बनली आहे. बाहेरगावाहून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही दुकानदारांनी स्वच्छतागृहांवर स्वतःच्या मालकीप्रमाणे ताबा मिळवल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक तसेच इतर व्यापाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गोलाणी मार्केट हे शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र मानले जाते. दररोज हजारो नागरिक येथे खरेदीसाठी येत असतात. अशा ठिकाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून नियमित साफसफाई करावी, सार्वजनिक स्वच्छतागृह सर्वांसाठी खुली करावीत तसेच अतिक्रमण अथवा गैरवापर होत असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.














