मुंबई:आफ्रिकेतील काही देशांमध्ये Ebola Virus Disease च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.जग पुन्हा एकदा गंभीर आरोग्य संकटाच्या छायेखाली आले आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता WHO ने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली (IHR 2005) अंतर्गत १७ मे २०२६ पासून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इबोला विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून त्याचा मृत्यूदरही मोठा आहे. त्यामुळे या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
भारतीय आरोग्य मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी तातडीने ट्रॅव्हलिंग नियमावली लागू केली आहे. सरकारने नागरिकांना कॉगो, युगांडा आणि साऊथ सुदान या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत या देशांमधील प्रवास पुढे ढकलावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
या संकटाच्या काळात भारताने आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारत सरकारने Africa Centres for Disease Control and Prevention येथे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य आणि संरक्षक उपकरणांची पहिली खेप पाठवली आहे.
परराष्ट्र मंत्री एस, जयशंकर यांनी सांगितले की, आफ्रिकन देशांची इबोला संकटाशी लढण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी ही मदत पाठवण्यात आली आहे. या खेपेत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक औषधे, उच्च दर्जाचे PPE किट, मास्क आणि इतर संरक्षक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.तसेच जे नागरिक अत्यावश्यक कारणांमुळे या देशांमध्ये राहत आहेत किंवा तेथे प्रवास करत आहेत, त्यांनी सर्व आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.एबोला हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांमधून हा संसर्ग पसरतो. ताप, अशक्तपणा, उलट्या, रक्तस्राव आणि अवयव निकामी होणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संस्था आणि विविध देशांच्या आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.














