जळगाव : के.एस.टी. उर्दू हायस्कूल, नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथील निवृत्त शिक्षकांच्या पेन्शन प्रस्तावांबाबत व कार्यरत शिक्षकांच्या मागील १० महिन्यांपासून थकीत वेतनाबाबत गंभीर अन्याय होत असल्याने जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदविला.
शिक्षणाधिकारी मॅडम यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्पष्ट शब्दांत सांगितले की, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्यास त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल व 3 दिवसांच्या आत के.एस.टी. उर्दू हायस्कूलच्या शिक्षकांचे थकीत वेतन तसेच मुख्याध्यापकांच्या पेन्शनचे प्रस्ताव सादर न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
*निवेदनातील प्रमुख मागण्या*
निवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव तात्काळ मंजूर करून पाठवावेत.
कार्यरत 5 शिक्षकांचे मागील सुमारे 10 महिन्यांपासून थकीत वेतन तात्काळ अदा करावे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन प्रकरणे प्रलंबित न ठेवता त्वरित निकाली काढावीत.
संबंधित प्रशासनातील ढिलाई व दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी.
*एकता संघटनेचा तीव्र इशारा*
शिष्टमंडळाने प्रशासनाला 7 दिवसांची अंतिम मुदत ( नोटीस) दिली असून,
जर या कालावधीत शिक्षकांचे वेतन व पेन्शन प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर
जिल्हा परिषद, जळगाव समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी दिला आहे.
“शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे — अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल!”*
असा ठाम इशारा जळगाव जिल्हा एकता संघटनेने दिला आहे.













