यावल: शहरातील गंगानगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती वाढली असून नवीन घरे व इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, महावितरणची वीज वितरण व्यवस्था अद्याप जुन्या शेतीच्या काळातील रचनेतच असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवर असलेल्या ॲल्युमिनियमच्या वीजवाहक तारांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंडप उभारताना खड्डे खोदण्याची वेळ
गंगानगर परिसर पूर्वी शेती क्षेत्रात मोडत होता. नंतर या भागात भूखंड (प्लॉट) पाडून वस्ती वसली, परंतु वीजतारांची उंची, मार्ग आणि सुरक्षित अंतर यामध्ये महावितरणकडून कोणताही बदल करण्यात आला नाही. ॲल्युमिनियमच्या तारा अत्यंत कमी उंचीवर असल्याने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी मंडप उभारताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मंडपाची उंची सांभाळण्यासाठी वीज पोलखालीच खड्डे खोडून काम चालवावे लागत आहे. खड्डे खोदताना वीजवाहिन्यांना इजा होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
११ केव्ही उच्चदाब वाहिनीचा तांत्रिक धोका
या परिसरातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एकाच मार्गावरून ११ केव्ही (11 KV) ची थ्री-फेज उच्चदाब वाहिनी आणि एलटी (LT) वाहिनी जात आहे. रहिवासी भागात या दोन्ही वाहिन्यांमध्ये नियमानुसार आवश्यक सुरक्षित अंतर आहे की नाही, याची तांत्रिक पाहणी झालेली नाही. वस्ती वाढलेली असताना महावितरणच्या या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.
महावितरण अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
या गंभीर समस्येबाबत यावलचे कार्यकारी अभियंता विशाल किनगे आणि विभागीय कार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी समस्येवर तातडीने तोडगा काढण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या या गैरजबाबदार भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कृषी वीज जोडण्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
एकीकडे रहिवासी भागातील धोकादायक वीजव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना वारंवार पाठपुरावा करावा लागत असताना, दुसरीकडे मागणीपत्र (Demand Note) नसतानाही कृषी वीज जोडण्यांचे वाटप वेगाने केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण कारभारात पारदर्शकता असावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाकडे मुख्य मागण्या:
-
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंगानगर परिसराची प्रत्यक्ष तांत्रिक पाहणी करावी.
-
११ केव्ही उच्चदाब वाहिनी आणि एलटी वाहिनीची उंची व सुरक्षित अंतर तातडीने वाढवावे.
-
धोकादायक स्थितीत असलेले वीज पोल आणि तारांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
-
कृषी जोडण्यांच्या प्रकरणांची चौकशी करून पारदर्शकता आणावी.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वेळेत पावले उचलून या धोकादायक व्यवस्थेत सुधारणा करणार का, याकडे समस्त गंगानगरवासीयांचे लक्ष लागले आहे.














