नाशिक: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games) भारताला १०० मीटर टी-४७ प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा सुपुत्र दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सुमारे २ ते अडीच तास ताटकळत राहावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. दीर्घकाळ वाट पाहूनही भेट न झाल्याने शेवटी संतप्त होऊन दोघांनीही तेथून काढता पाय घेतला.दरम्यान, या घटनेची तीव्र दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकी काय घडली घटना?
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दिलीप गावित आणि त्यांच्या प्रशिक्षकांना भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
नियोजित वेळेनुसार दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे शासकीय विश्रामगृहात पोहोचले. मात्र, तेथे त्यांना तब्बल अडीच तास बसवून ठेवण्यात आले. बराच वेळ वाट पाहूनही भेट होण्याची शक्यता न दिसल्याने ते अत्यंत नाराज झाले. यावेळी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु “भेटायचं नव्हतं तर कशाला बोलावलं?” असा सवाल करत त्यांनी भेट न घेताच निघून जाण्याचा निर्णय घेतला.
अतिदुर्गम भागातून सुवर्णकन्या-पुत्राची सोनेरी भरारी
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या अतिदुर्गम व आदिवासी भागातून पुढे आलेल्या दिलीप गावित यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ शर्यतीत १०.७१ सेकंदांची नोंद करत नवीन विक्रम आणि सुवर्णपदक पटकावले आहे. लहानपणी झालेल्या अपघातात उजवा हात गमावल्यानंतरही त्यांनी जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
क्रीडाप्रेमींमधून मात्र खेळाडूंचा सन्मान राखला जावा, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण अन् दिलगिरी
या घटनेवरून वाद निर्माण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत गैरसमज दूर केला.
राज ठाकरे म्हणाले,- “दिलीप गावित भेटीसाठी आले आहेत, याची मला कोणी कल्पनाच दिली नाही. खेळाडू आल्याचे मला कळवले गेले नाही, त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. तरीही त्यांना वाट पाहावी लागली आणि ते नाराज होऊन गेले, याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ते सध्या दिल्लीला गेले असून, तेथून परतल्यानंतर मी नक्की त्यांची भेट घेईन.”
“देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूला अशा प्रकारे ताटकळत ठेवणे योग्य नाही. भेट शक्य नव्हती तर आधीच स्पष्ट सांगायला हवे होते.”
— वैजनाथ काळे (प्रशिक्षक)














