जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही गटांनी एकत्र यायचे की नाही, हा निर्णय पूर्णपणे पवार कुटुंबच घेऊ शकते. सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबीयांनी जो निर्णय घेतला, तो आम्हाला पूर्णपणे मान्य आणि स्वीकारार्ह असेल,” असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर चर्चांना उधाण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीबाबत विचारले असता, अनिल पाटील यांनी राजकीय शक्यतांवर भाष्य केले. “या भेटीमागे नेमके काय कारण आहे, हे संबंधित नेतेच स्पष्ट करू शकतात. महाविकास आघाडीत काही मतभेद झाले आहेत का, की शरद पवार यांना एनडीएला (NDA) पाठिंबा द्यायचा आहे, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, या सर्व केवळ शक्यता आहेत,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “जर शरद पवार यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्व करेल. तरीही, त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला तर त्यांचे नक्कीच स्वागत असेल.”
“अजित पवारांनी साथ दिली नसती तर राजकीय अस्तित्व संपले असते”; एकनाथ खडसेंवर घणाघाती टीका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य पुनर्प्रवेशाच्या चर्चांवरून अनिल पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. खडसे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील म्हणाले, “भाजपमध्ये अन्याय झाल्याचे सांगत एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले होते. त्यावेळी पक्षासाठी ते मोठे योगदान देतील या अपेक्षेने त्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र, त्यांनी केवळ राजकीय पदांसाठीच पक्षात प्रवेश केला होता हे आता स्पष्ट होत आहे.”
“अजित पवार यांनी योग्य वेळी पाठिंबा दिला नसता, तर खडसे यांचे राजकीय अस्तित्वच संपले असते,” असा दावा करत अनिल पाटील यांनी टोला लगावला की, आता पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेणे ही खडसे यांची जुनीच राजकीय भूमिका दाखवून देते.












