Advertisement

जळगाव महापालिकेत भूखंड मूल्यांकनाचा १०० कोटींचा महाघोटाळा! आमदार राजूमामा भोळेंचा विधानसभेत धमाका

मुंबई : जळगाव महानगरपालिकेतील भूखंड मूल्यांकन प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि मोठा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा भोळे) यांनी केला आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे वाभाडे काढले.
शेती दराऐवजी व्यावसायिक दराने मूल्यांकन
आमदार राजूमामा भोळे यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, जळगाव महापालिकेच्या गट क्रमांक ५१०/३, ५१०/५, ५१०/७, ३३७/१, ३३७/२ आणि ३३७/३ या भूखंडांचे मूल्यांकन करताना नियमांना हरताळ फासण्यात आला. या जागांसाठी लागू असलेल्या शेती दराऐवजी (Agricultural Rate) थेट व्यावसायिक दराने (Commercial Rate) बाजारभाव लावण्यात आला.
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची मिलीभगत; १०० कोटींचा भुर्दंड
या प्रकरणात खोटी माहिती देण्यासाठी आणि वाढीव रकमेची आकारणी करण्यासाठी महापालिकेतील काही उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा थेट आरोप आमदार भोळे यांनी केला. या चुकीच्या मूल्यांकनामुळे आधीच अडचणीत असलेल्या महापालिकेवरील आर्थिक भार प्रचंड वाढला आहे. या व्यावसायिक दरामुळे शेतकऱ्यांना तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा अतिरिक्त निधी नाहक अदा करावा लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
हा महापालिकेला बसलेला खूप मोठा आर्थिक फटका असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भ्रष्टाचाराची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभा सभापतींकडेही केली आहे. या प्रकरणामुळे जळगाव महापालिकेचा कारभार आणि भूखंड मूल्यांकन प्रक्रिया पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Darpaan Jagat