Advertisement

माझा केसाने गळा कापला.. नाशिकमध्ये पराभवानंतर नरेंद्र दराडे कडाडले, महायुतीत मते फुटल्याचे स्पष्ट!

नाशिक: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पहिल्याच फेरीच्या मतमोजणीत गोकुळ गीते यांनी विजयाचा निश्चित कोटा पार करत महायुतीला मोठा धक्का दिला.
पहिल्याच फेरीत ‘गेम ओव्हर’!
नाशिक मतदारसंघात एकूण ६१८ मतदान झाले होते, ज्यापैकी १३ मते अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना तब्बल ३५७ मते मिळाली. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना केवळ २४८ मतांवर समाधान मानावे लागले. गोकुळ गीते यांनी १०९ मताधिक्य घेत पहिल्याच फेरीत कोटा पार केल्यामुळे दुसऱ्या पसंतीक्रमाची मते मोजण्याची गरजच भासली नाही.
“मी माघार घेतलीच नव्हती!” – गोकुळ गीते
निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, निकालानंतर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला. गीते म्हणाले, “मी निवडणुकीतून कधीही माघार घेतली नव्हती. तांत्रिकदृष्ट्या माझे नाव मतपत्रिकेवर कायम होते. माझ्या कार्यकर्त्यांनी बॅकग्राउंडला पूर्ण ताकदीने यंत्रणा राबवली आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, म्हणूनच हा विजय शक्य झाला.”
महायुतीत मोठे क्रॉस व्होटिंग; दराडे भावुक आणि आक्रमक
नाशिक मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे मिळून तब्बल ४६६ हून अधिक मते होती. कागदावर महायुतीचे पारडे जड असतानाही नरेंद्र दराडे यांना फक्त २४८ मते मिळाली. यावरून महायुतीची, विशेषतः भाजपची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. पराभवानंतर अत्यंत संतप्त आणि भावुक झालेल्या नरेंद्र दराडे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट आरोप केला. “माझा विश्वासघात झाला असून केसाने गळा कापण्यात आला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नाशिकमध्ये गुलाल आणि जल्लोष
गोकुळ गीते यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “गोकुळ भाऊ.. आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
या धक्कादायक निकालामुळे आता राज्यातील राजकीय समीकरणांवर नवीन चर्चा सुरू झाली असून, महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि अविश्वास पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून या क्रॉस व्होटिंगबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला जाण्याची शक्यता आहे.
Darpaan Jagat