Advertisement

शिरपूर येथील पर्यटक कुटुंबावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर ‘मोक्का’ लावा; पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा – जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी

जळगाव : धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील गार्डनमध्ये मध्यप्रदेशातील सेंधवा येथून पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून, या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करून संबंधित पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे सविस्तर निवेदन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र), पोलीस अधीक्षक धुळे यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालयाकडे पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर येथे पर्यटक कुटुंबावर चाकू व लोखंडी पाईपने झालेला जीवघेणा हल्ला हा केवळ एका कुटुंबावरील हल्ला नसून महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आणि पर्यटन क्षेत्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना आहे. अशा संघटित गुंडगिरीला तात्काळ आळा घालण्यासाठी आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्यात यावा, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, घटनेनंतर तब्बल तीन तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याचा आणि पीडितांवर तक्रार न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असलेल्या शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या भूमिकेची विशेष तपास पथकामार्फत (एस आय टी) चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पीडित कुटुंब गंभीर जखमी असताना आरोपींना संरक्षण देण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आलेली कथित बोगस व बेकायदेशीर क्रॉस तक्रार तात्काळ रद्द करण्यात यावी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही बिरादरीने केली आहे.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या सचिव श्रीमती वैशाली चव्हाण यांना बिरादरी लीगल सेलचे अँड आवेज शेख यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी अँड. आमिर शेख, सय्यद चांद, ताहेर शेख, अख्तर शेख, सलीम शेख टेलर तसेच एकता संघटनेचे मुझाहिद खान व नजमोद्दीन शेख उपस्थित होते.
जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरी तर्फे आवेज शेख यांनी स्पष्ट इशारा दिला असून, या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
Darpaan Jagat