जळगाव : पारोळा येथील नुरानी मशिदीचे धर्मगुरू सय्यद हकमअली हाशमअली यांना सार्वजनिक ठिकाणी घेराव घालून कथित मारहाण करणे, धमकावणे, विशिष्ट धार्मिक घोषणा देण्यास भाग पाडणे व संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा प्रकार केवळ एका धर्मगुरूवरील हल्ला नसून भारतीय संविधान, धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर झालेला गंभीर आघात असल्याची तीव्र प्रतिक्रिया एकता संघटनेचे संस्थापक समन्वयक फारुख शेख यांनी अमेरिका स्थित कॅलिफोनिया येथून व्यक्त केली आहे.
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 218/2026 दाखल झाला असला तरी व्हिडिओमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग दिसून येत असल्याचे सांगत सर्व संबंधित व्यक्तींना तात्काळ आरोपी करून अटक करण्याची मागणी एकता संघटनेने इमेल द्वारा अमेरिकेहून केली आहे.
फारुख शेख म्हणाले की, “एखाद्या नागरिकाला किंवा धर्मगुरूला त्याच्या धार्मिक ओळखीमुळे लक्ष्य करणे, त्याचा सार्वजनिक अपमान करणे आणि धार्मिक घोषणा देण्यासाठी दबाव टाकणे ही अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्ती वेळेवर रोखल्या नाहीत तर समाजातील सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल.”
सदर घटनेतील मुख्य आरोपी हेमंत उर्फ नाट्या मच्छिंद्र पवार याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार गुन्हे दाखल होऊनही जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ही बाब पोलीस प्रशासन आणि जिल्हा यंत्रणेसाठी गंभीर चिंतेची असल्याचे एकता संघटनेने म्हटले आहे.
एकता संघटनेने राज्य सरकार, पोलीस महासंचालक, मानवाधिकार आयोग आणि अल्पसंख्यांक आयोग यांना पाठविलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
● व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व व्यक्तींना आरोपी करण्यात यावे.
● सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
● व्हिडिओ, मोबाईल, सोशल मीडिया खाते, कॉल रेकॉर्ड व डिजिटल पुराव्यांची एफएसएल व सायबर तपासणी करण्यात यावी.
● धार्मिक तेढ निर्माण करणे, सामूहिक सहभाग, गुन्हेगारी कट व सार्वजनिक शांतता भंग करण्यासंबंधी लागू होणाऱ्या सर्व गंभीर कायदेशीर तरतुदींचा विचार करण्यात यावा.
● पीडित धर्मगुरू व त्यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
● मुख्य आरोपीचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास तपासून आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास त्याच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.
फारुख शेख यांनी इशारा देताना म्हटले आहे की, “महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. येथे कोणत्याही नागरिकाला धर्माच्या आधारावर अपमानित करण्याचा किंवा भयभीत करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.”
एकता संघटनेने राज्य शासनास या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष, कठोर आणि उदाहरण ठरेल अशी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा अल्पसंख्यांक समाजामध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र होईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.












