Advertisement

‘हायवे मॅन’ नितीन गडकरींचे सूचक वक्तव्य: “राजकारणापेक्षा आता शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करायचेय”

नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची आणि खातेबदलाची गणिते मांडली जात असतानाच, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रभावी नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे,” या सूचक विधानामुळे गडकरी राजकीय निवृत्ती घेणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पारडसिंगा येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या’ समारोप प्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले. २०१४ पासून सलग मोदी सरकारमध्ये महत्त्वाचे खाते सांभाळणारे आणि ‘हायवे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे गडकरी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी व्यक्त केलेली ही इच्छा राजकीय विश्लेषकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गडकरींच्या धोरणांवरून विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. विशेषतः इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या आग्रही वापरामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून येऊ लागल्या आहेत. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, गडकरी यांचे हे आत्मपरीक्षणात्मक विधान समोर आल्याने तर्क-वितर्कांना जागा मिळाली आहे.

आपल्या बदलत्या दिनचर्येबद्दल सांगताना गडकरी म्हणाले, “पूर्वी पक्षाचे काम करताना अगदी समोसे खाऊन कुठेही झोपायचो. पण कोरोनाच्या काळानंतर मी स्वतःला शिस्तीत आणले असून आता दररोज न चुकता योगा करतो. जर तब्येतच चांगली नसेल, तर मिळणारी सत्ता आणि पद काहीच कामाचे नसते.”

सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. आयुष्याच्या उर्वरित काळात राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे काम करण्याची तीव्र इच्छा त्यांनी बोलून दाखवली. आगामी काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच ज्येष्ठ मंत्र्याने नवी पिढी पुढे आणण्याचे केलेले हे आवाहन भारतीय राजकारणात मोठे फेरबदल घडवणारे ठरू शकते.

Darpaan Jagat