जळगाव – भविष्यातील वादविवाद टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने मृत्युपत्र बनविणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲड. महेश भोकरीकर यांनी केले.
गणपती नगरातील रोटरी सभागृहात रोटरी क्लब जळगाव पुरस्कृत आरसीसी ऑफ राईपच्यावतीने आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष पल्लवी शिंपी, रोटरीचे मानद सचिव सुभाष अमळनेरकर व लिटरसी कमिटी चेअरमन डाॅ. शुभदा कुलकर्णी उपस्थित होत्या.
आपल्या मनोगतात ॲड. भोकरीकर पुढे म्हणाले कि, मृत्युपत्र ही एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचे कसे वाटप व्हावे याबाबत केलेली कायदेशीर घोषणा होय आणि ती व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिची इच्छा व्यक्त करणारा तिचा कायदेशीर आवाज असते.
भारतामध्ये मृत्युपत्रासंबंधीचे कायदे इंडियन सेक्शन अॅक्ट १९२५ अंतर्गत येतात. मृत्युपत्र वैध ठरण्यासाठी ते लेखी असणे, संबंधित व्यक्तीची स्वाक्षरी आणि किमान दोन साक्षीदारांचे प्रमाणन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मृत्युपत्र कधीही बदलता येते व शेवटचे मृत्युपत्रच ग्राह्य धरले जाते. नोंदणी बंधनकारक नसली तरी भविष्यातील वाद टाळण्यासाठी ती उपयुक्त ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
योग्य पद्धतीने केलेले मृत्युपत्र कुटुंबातील वाद टाळण्यास मदत करते, त्यामुळे प्रत्येकाने वेळेवर मृत्युपत्र तयार करावे, असे आवाहन करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे शंकानिरसन करण्यात आले.
प्रास्ताविक पल्लवी शिंपी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती महाजन यांनी तर विनिता भट यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास आरसीसीच्या सदस्यांसह संवाद सचिव पंकज व्यवहारे, संजय दोशी, सुबोध सराफ, नित्यानंद पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













