नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तळेगाव शिवारातील एका एकांत बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या छपाई कारखान्यावर नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या सापळ्यात पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, लाखो रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१० लाखांच्या खऱ्या नोटांऐवजी ३० लाखांच्या बनावट नोटा
संशयित आरोपी खऱ्या १० लाख रुपयांच्या मोबदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून व्यवहार करत होते. असाच एक संशयित व्यवहार तळेगाव येथील बंगल्यात सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली.
केमिकल आणि शाईचा वापर करून छपाई
कारवाई दरम्यान पोलिसांना छपाईसाठी लागणारे विशेष केमिकल, शाई, प्रिंटिंग साहित्य व कागद आढळून आले आहेत. खऱ्या नोटा विशिष्ट रसायनात बुडवून त्यांची शाई दुसऱ्या कागदावर उठवून हुबेहूब बनावट नोटा तयार करण्याची क्लृप्ती आरोपी वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अटक करण्यात आलेले संशयित आरोपी
-
अमरेश्वर आईथा (तेलंगणा)
-
दासरी सत्यइ (तेलंगणा)
-
गोकुळ दाते (तळेगाव, नाशिक)
-
हिरामण दाते (तळेगाव, नाशिक)
-
मच्छिंद्र घनदाट (सातपूर, नाशिक)
धागेदोरे तेलंगणापर्यंत; आंतरराज्यीय रॅकेटचा संशय
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेलंगणातील दोघांचा समावेश असल्याने या रॅकेटचे धागेदोरे परराज्यातही पसरल्याचे स्पष्ट होत आहे. बनावट नोटांचे हे जाळे कुठे-कुठे पसरले आहे, आतापर्यंत किती नोटा बाजारात खपवण्यात आल्या आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.














