Advertisement

एसपी श्रीकांत धिवरे यांना उत्कृष्ट सेवा पदक; दिनेश बडगुजर व मुजफ्फरअली सैय्यद यांना राष्ट्रपती पदक!

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने जळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली जफरअली सैय्यद यांना ‘राष्ट्रपती पदक’ (गुणवत्तापूर्ण सेवा) जाहीर झाले आहे.

कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर वचक बसवणे आणि पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाने त्यांचा हा सन्मान केला आहे.

तसेच, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फरअली सैय्यद यांच्या प्रदीर्घ, शिस्तबद्ध आणि प्रदीर्घ सेवेची दखल घेत राष्ट्रपती पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सन्मान मिळाल्याने जळगाव पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे.

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजरोहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते या तिन्ही पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक पदक प्रदान केले जाणार आहे. या यशामुळे जिल्हा पोलीस दलासह सर्वच स्तरातून या अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Darpaan Jagat