Advertisement

अल्पसंख्याक व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड होऊ देणार नाही”

जळगाव : मनपा उर्दू शाळा क्रमांक १३ चे प्रस्तावित स्थलांतर हा केवळ प्रशासकीय विषय नसून गरीब, कष्टकरी व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रश्न असल्याची भूमिका एकता संघटनेने घेतली आहे. या संदर्भात महापौर, आयुक्त, शिक्षण विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देत शासनाच्या १५ मे २०२६ च्या शासन निर्णयाचा दाखला देण्यात आला.
एकता संघटनेचे  फारुक शेख यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मे २६ रोजी काढलेल्या शासन निर्णय क्रमांक ३३२१ नुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीत किंवा भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीच शाळा स्थलांतरास परवानगी राहणार आहे. मात्र मनपा उर्दू शाळा क्रमांक १३ बाबत अशी कोणतीही अपवादात्मक परिस्थिती अस्तित्वात नसताना स्थलांतराचा घाट का रचला जात आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, तब्बल २६ वर्षांपूर्वी तत्कालीन नगरपालिका शिक्षण मंडळ व नगरपालिकेने स्वतः अधिकृत निर्णय घेऊन सदर उर्दू शाळेला विद्यमान इमारतीत स्थलांतरित केले होते. त्या काळापासून शाळा नियमित सुरू असून विद्यार्थ्यांची पटसंख्या समाधानकारक आहे. त्यामुळे अचानक स्थलांतराचा विषय पुढे येणे हे वास्तवाशी विसंगत असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे याच प्रभागातील असून त्यांच्या शिक्षणावर स्थलांतराचा थेट परिणाम होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार शिवाजीनगर परिसरातील ४३ विद्यार्थी, शिवाजीनगर हुडको येथील ५८ विद्यार्थी, अमन कॉलनीतील ५ विद्यार्थी, उस्मानिया v मोहम्मदिया भागातील १३ विद्यार्थी तसेच मुगल गार्डन परिसरातील ३२ विद्यार्थी असे एकूण १५१ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ही शाळा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची शिक्षणसंस्था बनली असून स्थलांतर झाल्यास गरीब व कष्टकरी पालकांच्या मुलांचे शिक्षण विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 महापौर दीपमाला काळे यांच्यासोबत विद्यार्थी, पालक, शिक्षक व एकता संघटनेची बैठक झाली. यावेळी महापौरांनी शाळेला हिरवा रंग देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण इमारतीवर कुठेही हिरवा रंग नसल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. तसेच टेरेसवर जाण्यासाठी अडथळे निर्माण करणारे बार बसवले असल्याचे कारणही वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत मंदिर व  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दाही मांडण्यात आला. यावर फारुक शेख यांनी सांगितले की, त्या ठिकाणी पूर्वीपासून छोटा पुतळा होता व नव्या पुतळ्याचा चौथरा सुमारे २५ ते ३० फूट उंच असल्याने लहान मुलांचा त्याच्याशी कोणताही संबंध येत नाही. मंदिर परिसर व शाळा यांच्यामध्ये स्वतंत्र भिंत असून आस्थेचा प्रश्नच निर्माण होत नाही.
महापौरांनी विद्यार्थी डबे आणून परिसरात विस्टा टाकतात, असे कारण मांडले असता, शाळेत पोषण आहार दिला जात असल्याने विद्यार्थी डबे आणत नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले. त्यामुळे ते कारणही तथ्यहीन असल्याचे सांगण्यात आले.
एकता संघटनेचे फारुक शेख यांनी सर्व मुद्द्यांवर समाधानकारक माहिती दिल्यानंतरही अंतिम निर्णय न घेता संबंधित प्रभागातील चारही नगरसेवक, शिक्षणाधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक, एकता संघटना व संबंधित पक्षांची संयुक्त बैठक घेऊन त्यानंतर विषय महासभेत मांडला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
एकता संघटनेतर्फे सविस्तर निवेदन उपायुक्त धनश्री शिंदे तसेच प्रशासकीय अधिकारी शिक्षण मंडळ मनपा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
महानगरपालिकेत आपली व्यथा मांडण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व एकता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षणाचा अधिकार कायदा (आर टी इ ), शासनाचे नवीन स्थलांतर धोरण व सामाजिक समतेच्या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शाळेचे स्थलांतर रद्द करून विद्यमान ठिकाणीच शाळा अधिक सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
“मनपा शाळा ही सर्व समाजाची शाळा आहे. उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षणाचा समान अधिकार आहे. शिक्षण व सामाजिक सलोखा जपण्यासाठी सकारात्मक निर्णय व्हावा,” अशी अपेक्षा एकता संघटने चे फारुक शेख यांनी व्यक्त केली.
Darpaan Jagat