अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे उच्चस्तरीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल होण्यापूर्वीच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. मागण्यांबाबत सरकारने २८ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल. मात्र, सरकारने काही ‘डाव’ टाकल्यास हे आंदोलन थेट मुंबईत धडकवेल, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
सरकारचा गैरसमज; आम्ही वेड्यात निघणार नाही मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि ५८ लाख नोंदींच्या अंमलबजावणीवरून जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले आहेत. शिष्टमंडळाच्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही मराठ्यांना वेड्यात काढतो हा सरकारचा गैरसमज आहे. ५८ लाख नोंदी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. शिष्टमंडळ आणि सरकारने या गैरसमाजातून बाहेर पडावे, आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही.”
‘वर्षा’च्या स्लॅबवर बसून आंदोलन करू! गेल्या तीन वर्षांत राज्यात आलेल्या प्रत्येक सरकारचा मराठा समाजाने सन्मान केला, पण प्रत्येक वेळी केवळ चर्चेचे गुऱ्हाळ चालवून वेळकाढूपणा केला गेला, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
-
२८ ऑगस्टची डेडलाईन: शासनाने २८ ऑगस्टच्या आत मागण्यांबाबत काय करणार ते स्पष्ट करावे. आता कसलीही सवलत किंवा वाढीव वेळ मिळणार नाही.
-
मुंबईची धडक: आंदोलनात सरकारने अडथळे आणल्यास आंदोलन मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर नेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोलीत अडचण येत असेल, तर बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करू.
-
आवाहन: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांनी २९ ऑगस्टच्या या निर्णायक आंदोलनासाठी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत उपस्थित राहावे.
मनोज जरांगे पाटलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री परिसरात आंदोलनाची पूर्वतयारी वेगाने सुरू झाली असून प्रशासनाची धडधड वाढली आहे.














