जळगाव:विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहिले की पक्ष दखल घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही संधी देत न्याय देतो हे यावरून स्पष्ट आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत जळगावचे नंदकिशोर महाजन यांचे नाव समोर येताच राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि चर्चांना उधाण आलेे. उमेदवारीसाठी अनेक प्रस्थापित आणि प्रभावशाली नेत्यांची नावे चर्चेत असताना पक्षश्रेष्ठींनी शेवटच्या क्षणी धक्कातंत्राचा वापर करत महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाकडे केवळ राजकीय नियुक्ती म्हणून नव्हे, तर तब्बल दोन दशकांच्या पक्षनिष्ठेची आणि संघटनात्मक कार्याची मिळालेली पावती म्हणून पाहिले जात आहे. भाजपमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम करताना नंदकिशोर महाजन यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणे, निवडणुकांमध्ये संघटनात्मक कामाला प्राधान्य देणे आणि पक्षाच्या धोरणांशी एकनिष्ठ राहणे, ही त्यांची ओळख राहिली आहे. त्यामुळे उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. अनेक अनुभवी आणि वजनदार नेत्यांची नावे चर्चेत असताना महाजन यांची निवड झाल्याने भाजपने पुन्हा एकदा पक्षासाठी काम करणाऱ्यांची दखल घेतली जाते हा संदेश दिल्याचे मानले जात आहे. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आहे, तर दुसरीकडे पदासाठी स्पर्धा करणाऱ्या इच्छुकांना पक्षनिष्ठा आणि संयम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. पक्षाशी दीर्घकाळ प्रामाणिक राहिल्यास योग्य वेळी संधी मिळू शकते, हा संदेश या उमेदवारीतून राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातही या निर्णयाचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत. महाजन यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे बोलले जात आहे. अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्णय संघटनात्मक कार्याला मिळालेला सन्मान असल्याची भावना व्यक्त केली आहे.












