जळगाव: भारतीय जनता पक्षाच्या जळगाव येथील जिल्हा बैठकीदरम्यान एका मोठ्या राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.
जिल्हा बैठकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपस्थित असतानाच मंत्री गिरीश महाजन यांचे आगमन झाले. मात्र, महाजन बैठकीच्या ठिकाणी पोहोचताच काहीच वेळात रक्षा खडसे अचानक बैठकीतून बाहेर पडल्या. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याच्या चर्चांनी जोर धरला.
गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण: “काहीही वाद नाही…”
या सर्व राजकीय नाट्यावर आणि सुरू असलेल्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले:
“रक्षा खडसे यांची उद्या दिल्लीत अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. त्यांना सायंकाळी ७ वाजताच्या विमानाने दिल्लीला रवाना व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी मला पूर्वकल्पना देऊनच १ तास आधी बैठक सोडली आहे. पक्षांतर्गत कोणताही वाद नाही. त्यांच्या कौटुंबिक विषयाशी पक्षाचा काही संबंध नाही.”
‘त्या’ अमृत महोत्सवाची किनार?
जरी महाजन यांनी या घटनेला ‘विमानाच्या वेळेचे’ कारण दिले असले, तरी राजकीय जाणकारांच्या मते यामागे वेगळेच कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा ‘अमृत महोत्सवी’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील सर्वच बडे नेते उपस्थित होते. निमंत्रण असूनही स्थानिक भाजपच्या बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे खडसे परिवार आणि विशेषतः रक्षा खडसे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आजच्या घटनेमुळे या चर्चांना पुन्हा एकदा नवी हवा मिळाली आहे.















