पाळधी : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नोबल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी यांच्या वतीने शाळेपासून श्री विठ्ठल मंदिर, पाळधी येथे भव्य आणि भक्तिमय पायी वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अभंगांच्या भक्तिरसात न्हालेली ही दिंडी संपूर्ण गावासाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या चेअरमन डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी व डायरेक्टर श्री. प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती आकर्षक फुलांची सजावट केलेल्या पारंपरिक बैलगाडीतून मिरवणुकीच्या अग्रभागी नेण्यात आली. सुशोभित बैलगाडी, भगवे ध्वज आणि भक्तिमय वातावरणामुळे वारीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
वारीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताबाई तसेच इतर संतांच्या वेशभूषा धारण करून वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले. पारंपरिक भगवे झेंडे, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंगाच्या साथीने आणि भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मार्गभर “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला.
विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनीही मनापासून स्वागत केले. श्री विठ्ठल मंदिरात दर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी केळी, साबुदाणा खिचडी, पिण्याचे पाणी आदी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी शाळेच्या चेअरमन डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी, डायरेक्टर श्री. प्रशांत सूर्यवंशी, मुख्याध्यापक श्री. भूषण चव्हाण, कोऑर्डिनेटर श्री. उज्वल पाटील, अकॅडमिक इन्चार्ज श्री. अंकुर कुलकर्णी, जोशी मॅडम, सर्व शिक्षकवृंद, वाहनचालक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
भक्ती, संस्कार, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणाऱ्या या वारीने विद्यार्थ्यांच्या मनात वारकरी संप्रदायाबद्दल आदर, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि अध्यात्माची गोड ओढ निर्माण केली. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.














