जळगाव: शहरातील ‘न्यू भिकमचंद जैन मार्केट’ (न्यू बी. जे. मार्केट) परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेकडून नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने व्यापारी आणि ग्राहकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
दुर्गंधीमुळे ग्राहक फिरकेना: मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते अंतर्गत गॅलरी आणि कोपऱ्यांपर्यंत सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सांडपाण्याची वाहिनी फुटल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बाजारात येणारे ग्राहक तोंडाला रुमाल लावल्याशिवाय आत येऊ शकत नाहीत, ज्याचा थेट फटका व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर बसत आहे.
स्वच्छतागृह नावालाच: मार्केटमध्ये आठ ठिकाणी स्वच्छतागृहे असून त्यापैकी केवळ दोनच ठिकाणी बीओटी (BOT) तत्वावर सुरू आहेत. उर्वरित स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. तिथे जाण्यासाठी तोंडाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. सध्याची स्थिती पाहिली तर कित्येक वर्षांपासून या स्वच्छतागृहांची स्वच्छता झालीच नसल्याचे दिसते. “आमचे ऐकणारेच कोणी राहिले नसून स्वच्छतेसाठी वापरला जाणारा निधी नक्की जातो कुठे?” असा प्रश्न स्थानिक दुकानदारांनी उपस्थित केला आहे.
सुरक्षा यंत्रणा नाही, चोऱ्यांचे प्रमाण वाढले: महापालिकेची कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने ‘कोणीही या आणि वाटेल ते करा’, अशी अवस्था या मार्केटची झाली आहे. सुरक्षारक्षक नसल्याने रात्री-अपरात्री दुकानांमध्ये चोरीचे प्रकार नित्याचेच झाले असून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मनपा प्रशासनाकडूनही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. स्वच्छतेचे आणि देखभालीचे ठेकेदार आपल्याच कामात मश्गूल असल्याची ओरड व्यापाऱ्यांमध्ये आहे.
अतिक्रमणाचा विळखा: घाणीच्या साम्राज्यासोबतच या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमणे वाढली आहेत. गॅरेज चालक, भंगार विक्रेते आणि हॉकर्स यांनी ग्राहकांच्या चालण्याचे रस्ते आणि पार्किंगच्या जागा अडवून ठेवल्या आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- रविवारी विद्यार्थ्यांना टार्गेट: रविवारी सुटीच्या दिवशी जळगाव शहर आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासाचे साहित्य खरेदीसाठी न्यू बी. जे. मार्केटमध्ये येतात. मार्केटमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याचा गैरफायदा घेत तृतीयपंथीय या विद्यार्थ्यांना घेरतात आणि पैशांची मागणी करतात. विद्यार्थ्यांकडे पैसे नसले तरी त्यांना अडवून ठेवून, दमदाटी करून खिशातले पैसे काढून घेतले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- व्यापारी आणि ग्राहकही त्रस्त: केवळ विद्यार्थीच नव्हे, तर दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना आणि खरेदीसाठी येणाऱ्या कुटुंबांनाही पैशांसाठी नाहक त्रास दिला जातो. पैसे देण्यास नकार दिल्यास जाहीरपणे अश्लील वर्तन आणि शिवीगाळ केली जाते. या त्रासामुळे ग्राहक आता मार्केटमध्ये येण्याचे टाळत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
व्यापाऱ्यांचा संताप आणि आंदोलनाचा इशारा: “आम्ही महापालिकेला दरवर्षी नियमितपणे लाखो रुपयांचा मालमत्ता कर आणि इतर कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा का दिल्या जात नाहीत?” असा संतप्त सवाल गाळेधारकांनी उपस्थित केला आहे. मनपा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन संपूर्ण मार्केटची स्वच्छता करावी, सुरक्षा रक्षक नेमावेत आणि अतिक्रमणधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्यथा मनपा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक व्यापारी संघटनेने दिला आहे.













