Advertisement

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा आणि विकासगाथा सांगा: मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यकर्त्यांना निर्देश

धरणगाव (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, जळगाव पश्चिम जिल्ह्याची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक नुकतीच धरणगाव येथे पार पडली. ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसह विविध राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये दणदणीत यश मिळवण्याचा संकल्प या बैठकीत सोडण्यात आला.


सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा; गिरीश महाजन

बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकारच्या योजना आणि विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. विरोधकांकडून केला जाणारा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार सोशल मीडियाच्या प्रभावी वापराद्वारे हाणून पाडला पाहिजे.”

त्यांनी पुढे ग्वाही दिली की, पक्ष आणि नेतृत्व नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. आगामी काळात संघटना अधिक बळकट करून जनतेशी असलेले नाते दृढ करण्यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.


बैठकीत तीन महत्त्वाचे राजकीय प्रस्ताव एकमताने मंजूर

या कार्यकारिणी बैठकीत आगामी राजकीय व सामाजिक दिशानिर्देश ठरवणारे तीन महत्त्वाचे प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आले:

  1. युवाशक्ती, संधी व विकसित भारताचा संकल्प: हा अभिनंदन प्रस्ताव जिल्हा महामंत्री कपिल पाटील यांनी मांडला, तर मधुभाऊ काटे आणि कृतिकाताई आफरे यांनी त्यास अनुमोदन दिले.

  2. विकसित महाराष्ट्रासाठी साथ द्या: हा राजकीय प्रस्ताव पोपट तात्या भोळे यांनी मांडला असून, जिल्हा प्रभारी प्रदीप पेशकर आणि ज्ञानेश्वर महाराज पाटील यांनी अनुमोदन दिले.

  3. अपप्रचाराला विकासगाथा कथनाने उत्तर द्या: हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी मांडला, तर एरंडोलचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि अॅड. व्ही. आर. पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले.


मागासवर्गीय धोरणे व बूथ स्तरावर कार्याचा संकल्प

  • नेत्यांचे मार्गदर्शन: वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भाषणात सांगितले की, भाजपा सरकारने मागासवर्गीय समाजाला न्याय आणि संधी देणारी अनेक धोरणे राबविली आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित ‘पंचतीर्थां’च्या विकासासाठी सरकारने ऐतिहासिक पावले उचलली आहेत.

  • शासकीय कामांत मदत: आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी विजयाचे समीकरण जुळवण्याचे आवाहन केले.

  • बूथ स्तरापर्यंत विकासगाथा: जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी २०१४ पासून मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात झालेला बदल आणि विकासकामे केवळ सभांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक बूथ स्तरापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. तसेच श्रीराम मंदिर दान चोरी प्रकरणातील तथ्ये जनतेसमोर मांडून ट्रस्टची विश्वासार्हता स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

याशिवाय, बैठकीत SIR संदर्भात गोपाळ भंगाळे यांनी तर ‘सेवा संकल्प अभियान’बाबत एस. आर. पाटील यांनी सविस्तर निवेदन सादर केले.


पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उदंड उपस्थिती

या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार नंदकिशोर महाजन, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, माजी आमदार महेंद्रसिंग बापू पाटील, किशोर काळकर, रोहित निकम यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाडी व प्रकोष्ठांचे जिल्हा अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण मंडळाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक महामंत्री अमोल नाना पाटील यांनी मांडले, तर सूत्रसंचालन अॅड. युवराज रायपूरकर यांनी केले.

Darpaan Jagat