जळगाव: तामसवाडी, पारोळा येथे नुरानी मशीदचे धर्मगुरू मौलाना सय्यद हकम अली हाशम अली यांना धमकी देणे व जबरदस्तीने धार्मिक घोषणा देण्याच्या गंभीर घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संवेदनशील वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी संबंधित आरोपीने व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितल्यानंतरही काही व्यक्तींकडून सोशल मीडियावर नवीन कथानक (फेक नॅरेटिव्ह) उभे करून समाजामध्ये संभ्रम व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकता संघटनेचे संस्थापक समन्वयक फारुख शेख यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार “hemant_pawar” या इन्स्टाग्राम अकाउंटवरून संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून या अकाउंटवर सुमारे 1407 फॉलोअर्स आहेत. सदर व्हिडिओमध्ये बोलणारी महिला भाग्यश्री रवी पाटील, रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा, जि. जळगाव असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमधील विधानांची सत्यता, त्यामागील उद्देश, तसेच समाजात धार्मिक किंवा सामाजिक वैमनस्य निर्माण करण्याचा हेतू होता का, याची सखोल सायबर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फारुख शेख यांनी म्हटले आहे की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते; परंतु संविधानाच्या कलम 19(2) नुसार सार्वजनिक सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि इतर नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी या स्वातंत्र्यावर योग्य निर्बंध आहेत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसारित करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणणे आवश्यक आहे.
एकता संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची सायबर तपासणी, व्हिडिओचा मूळ स्रोत, प्रसारणाची साखळी आणि संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका तपासण्याची मागणी केली आहे. तपासात धार्मिक तेढ निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे किंवा इतर गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आढळल्यास भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर लागू तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“धर्माच्या नावावर समाजामध्ये द्वेष निर्माण करणारा, अफवा पसरविणारा किंवा सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारा कोणताही व्यक्ती असो, त्याला कायद्यापुढे उत्तर द्यावेच लागेल. महाराष्ट्राची सामाजिक एकता आणि संविधानिक मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रवृत्तींचा एकता संघटन तीव्र निषेध करते,” असे फारुख शेख यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक व तातडीने कारवाई करून भविष्यात अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर संदेश द्यावा, अशी मागणी एकता संघटनेतर्फे करण्यात आली आहे.












