Advertisement

एरंडोलमध्ये महसूल विभागाचा वाळू माफियांवर मोठा सर्जिकल स्ट्राईक; सोळा चाकी ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त


जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत वाळूने भरलेला एक सोळा चाकी ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, यामुळे वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात आता अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उत्राण परिसरात सापळा
एरंडोल तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या पथकाने उत्राण गुजर परिसरात गस्त सुरू केली. यावेळी संशयास्पदरीत्या वाळू वाहून नेणारा सोळा चाकी ट्रक आणि एक ट्रॅक्टर पथकाच्या जाळ्यात अडकला.
पथकाची धडक कारवाई; वाहने तहसील कार्यालयात जमा
निवासी नायब तहसीलदार संजय घुले, मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी गजानन बहुरे, रविराज पाटील, आकाश महाजन, संदीप पाटील आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळावरच दोन्ही वाहने ताब्यात घेतली. ही सर्व वाहने जप्त करून एरंडोल तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून, पुढील दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
रात्रीच्या अंधारात वाळू उपसा जोरात
गेल्या काही महिन्यांपासून एरंडोल तालुक्यातील गिरणा नदी पात्रासह विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर वाळू आणि मुरुमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. विशेषतः मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत या भागांतून वाळूची चोरटी वाहतूक केली जाते. उत्राण, हनमंतखेडा, कढोली, टाकरखेडा तसेच गिरणा नदी परिसरात वाळू माफिया सक्रिय असल्याचे समोर आले आहे. तसेच पद्मालय, उमरदे आणि विखरण परिसरातून मुरुमाचीही अवैध वाहतूक होत असल्याची माहिती आहे.
रस्त्यांची दुरवस्था आणि पर्यावरणाचा ऱ्हास
वाळू उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच ओव्हरलोड अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोलही धोक्यात आला असून स्थानिक नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, अशीच कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
Darpaan Jagat