Advertisement

दोन मुली बेपत्ता, दोन कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील दोन स्वतंत्र पण अत्यंत गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांनी कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अडावद येथील मुस्कान शकील खाटीक प्रकरण आणि झाडी (ता. अमळनेर) येथील अल्पवयीन सानिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर शंका उपस्थित झाल्या असून एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी या दोन्ही प्रकरणांची उच्चस्तरीय, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अडावद येथील मुस्कान शकील खाटीक प्रकरणात कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांना मुलीची स्वतंत्र भेट घेण्याची संधी नाकारण्यात आली. कथित विवाह व संभाव्य धर्मांतराच्या बातम्या समोर येत असताना मुलीचा जबाब पूर्णपणे दबावमुक्त वातावरणात नोंदविण्यात आला आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे.
*अल्पवयीन मुलगी अपहरण*
दुसरीकडे झाडी येथील शेख मुस्ताक शेख वजीर यांच्या अल्पवयीन मुलगी  (वय 16 वर्षे 11 महिने 28 दिवस) हिच्या प्रकरणात परिस्थिती आणखी गंभीर आहे. फिर्यादीने लेखी तक्रारीत संशयित व्यक्ती म्हणून समाधान छबिलाल भील याचे नाव स्पष्टपणे नमूद केले असतानाही मारवाड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात आरोपीचे नाव वगळून “अज्ञात इसम” असा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्तीसोबत मुलगी जाताना दिसत असल्याचा दावा असतानाही आरोपीचे नाव गुन्ह्यात का समाविष्ट करण्यात आले नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
 मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सो कायद्यांतर्गत आवश्यक कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन सांगितले की, “दोन्ही प्रकरणांमध्ये कुटुंबीयांच्या गंभीर तक्रारी असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध नाही. मात्र कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. मुलगी सज्ञान असो वा अल्पवयीन, सत्य बाहेर येणे आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जर सर्व काही कायदेशीर व स्वेच्छेने झाले असेल तर चौकशीत ते स्पष्ट होईल. परंतु जर दबाव, फसवणूक, प्रलोभन, प्रभाव, कर्तव्यात कसूर किंवा तपासातील हलगर्जीपणा आढळला, तर संबंधित व्यक्ती व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
एकता संघटनेने महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, मानवाधिकार आयोग, अल्पसंख्यांक आयोग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
● दोन्ही प्रकरणांची स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (एस आय टी) चौकशी करण्यात यावी.
● संबंधित मुलींचे जबाब न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्रपणे नोंदविण्यात यावेत.
● कथित विवाह, धर्मांतर, दस्तऐवज व त्यांची कायदेशीर वैधता तपासण्यात यावी.
● अल्पवयीन मुली अपहरण प्रकरणात लागू असलेली पॉक्सो व इतर संबंधित कायदेशीर तरतुदी तपासण्यात याव्यात.
● संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची विभागीय चौकशी करण्यात यावी.
● कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत वरिष्ठ स्तरावरून प्रकरणांवर थेट देखरेख ठेवण्यात यावी.
“आम्ही संघर्षासाठी नाही तर न्यायासाठी उभे आहोत. पण जर सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला, तर एकता संघटन लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यास मागे-पुढे पाहणार नाही,” असा इशाराही फारूक शेख यांनी दिला.
*शिष्टमंडळात यांचा होता समावेश*
एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वात व हाफिज रहीम पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली  फिर्यादी रुकसाना भी बशीर खाटीक वरळी ,चोपडा, दुसऱ्या प्रकरणातील फिर्यादी शेख मुस्ताक शेख वजीर, झाडी, तालुका अमळनेर. यासह मतीन पटेल, ताहेर शेख, रहीम पटेल , अनिस शाह, मेहमूद रंगरेज , इसा हमीद शेख, शाबीर दगडू रिजवान, खाटीक इम्रान खाटीक, शौकत खाटीक ,इमा शेख, लुकमान शेख ,साहिल खाटीक आदींचा समावेश होता.
Darpaan Jagat