Advertisement

सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा: जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

जळगाव ,प्रतिनिधी:  सेवा संकल्प अभियानात लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासोबतच महत्त्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून हे अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार असून, याच्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभागी झाले होते.


‘सेवा सेतू’ आणि प्रमुख उपक्रम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू’ उपक्रमाद्वारे नागरिकांना खालील प्रमुख सेवा उपलब्ध करून दिल्या जातील:

  • महसूल व शेती: प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे, जिवंत सातबारा मोहीम राबवणे.

  • आदिवासी कल्याण: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी.

  • इतर सेवा: गावठाणातील नागरिकांना ‘स्वामित्व सनद’ वाटप करणे, दिव्यांगांना प्रमाणपत्र देणे आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे.


युवा, विद्यार्थी आणि सामाजिक सहभाग:

  • इनोव्हेशन चॅलेंज: जिल्ह्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट्सना जोडून नवीन सोल्युशन्स विकसित करण्यावर भर दिला जाईल.

  • सेवा माझे योगदान: स्थानिक गरजेनुसार रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, महिलांचे आरोग्य व पोषण आणि ॲनिमियाबाबत जनजागृती केली जाईल.

  • शालेय स्पर्धा: शाळांमध्ये ‘विकसित भारत’ विषयावर चित्रकला आणि ‘विकसित भारत-२०४७’ व ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.

  • जाहिरात व रॅली: ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अंतर्गत ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅलीचे आयोजन केले जाईल. तसेच सर्व अंगणवाड्यांमध्ये मातांना आमंत्रित करून आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल.

Darpaan Jagat